बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि तरुणाईची संघर्षयात्रा
अहिंसक आंदोलनांची गरज प्रत्येक लोकशाही व्यवस्थेत असते. परंतु आज बेरोजगारीमुळे उद्ध्वस्त झालेल्या तरुणांना संयमाने आवरणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे. रोजगाराच्या संधींचा अभाव, वैयक्तिक आयुष्यातील असुरक्षितता, त्यातून निर्माण होणारे नैराश्य, व्यसनाधीनता, व अविवाहीतता या सर्वांचा थेट परिणाम तरुणांच्या जीवनावर होत आहे. यामुळे पालकही मानसिक व आर्थिक दृष्ट्या कोलमडून जात आहेत. धर्मांधता व जातीयता एका विशिष्ट मर्यादेपलीकडे बेरोजगारी व भ्रष्टाचारामुळे निर्माण झालेल्या आगीला रोखू शकणार नाहीत. आजचा तरुण सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचे धाडस दाखवत आहे आणि आवश्यक तेव्हा रक्त सांडायलाही मागे हटत नाही. हेच क्रांतीचे लक्षण आहे. शेजारील देश नेपाळमध्ये तरुणांनी Gen Z आंदोलनांच्या माध्यमातून सत्तांतर घडवून आणले आहे. यावरून स्पष्ट होते की तरुणाई मध्ये व्यवस्था बदलण्याइतकी ताकद आहे.
गेल्या काही वर्षांपासून नेपाळमध्ये चालू असलेली राजकीय अस्थिरता, आर्थिक तंगी, वाढती बेरोजगारी, महागाई, आर्थिक विषमता, भ्रष्टाचार व नेत्यांची अश्लील ऐशआरामशाही यामुळे तिथल्या सामान्य लोकांमध्ये व युवकांमध्ये प्रचंड संताप साचत होता, जो सोशल मीडियावर प्रखर चर्चेचा विषय होता. या आंदोलनापूर्वीच सोशल मीडियावर #nepokids आणि #Nepobaby हे टॅग्स असलेले पोस्ट्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते, ज्यात नेपाळचे युवक नेत्यांचा भ्रष्टाचार आणि त्यांच्या लेकरांच्या ऐशआरामी जीवनाचा पर्दाफाश करत होते. ओली सरकारने सोशल मीडियावर घातलेल्या बंदीने या आधीच पेटलेल्या जनआक्रोशाच्या आगीत तेल ओतल्यासारखे झाले.
नेपाळमधील युवकांचे हे बंड केवळ सत्ताधारी सुधारणावादी पक्ष किंवा त्याच्या नेत्यांविरुद्धच नाही, तर गेल्या दोन दशकांत सत्तेत सहभागी झालेल्या किंवा सत्तेजवळ असलेल्या सर्वच पक्ष व नेते आणि धनिकांविरुद्ध आहे. त्यामुळेच आंदोलनकर्त्यांच्या निशाण्यावर संसद, पंतप्रधान निवास, राष्ट्रपती निवास, प्रशासकीय मुख्यालय, सर्वोच्च न्यायालय तसेच सर्व मोठ्या पक्षांची कार्यालये व त्यांच्या नेत्यांची घरे होती.
भारतात देखील परिस्थिती वेगळी नाही म्हणूनच गावोगावी अहिंसक आंदोलनांची चळवळ उभारणे ही काळाची गरज आहे. रोजगार, शिक्षण, आरोग्यसेवा यातील व्यापारीकरण तसेच सर्व स्तरावर बोकाळलेला भ्रष्टाचार या सर्वांविरुद्ध तरुणाईत वाढत चाललेली उदासीनता जर आंदोलनात परिवर्तित झाली. तर भ्रष्ट व्यवस्थेला ठिकाणावर आणता येईल.MIDC मधील कामगारांची अवस्था, शेती क्षेत्रातील उदासीनता, नोकऱ्यांमधील व्यपारीकरण, वाढता खर्च व त्यामागून येणारा कर्जाचा डोंगर याला जबाबदार भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचाराचे नमुनेदार उदाहरण म्हणजे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भरतीतील घोटाळे. पैशाच्या जोरावर २५ ते ३० लाख रुपयांच्या बोलीवर नोकऱ्यांचे वाटप होत असल्याच्या घटना उघडपणाने दिसत आहेत. परीक्षा पारदर्शक पद्धतीने न घेता, फक्त पैशाच्या बळावर निवड केली जाते. परिणामी, श्रीमंतांची मुले नोकरीला लागतात तर गरीब पालक आपल्या मुलाला नोकरी मिळावी म्हणून घर, जमीन, सोने विकून अथवा गहाण ठेवून प्रयत्न करत राहतात. एवढेच नव्हे तर, बँकेशी काहीही संबंध नसलेल्या टोळ्याही नोकरीचे आमिष दाखवून सर्वसामान्यांची लूट करत आहेत. या गंभीर विषयावर ठाणे जिल्ह्यातील कुठलाही नेता आजवर ठामपणे उभा राहिलेला नाही व राहणार देखील नाही कारण त्यांचे आर्थिक हितसमंध यात नेहमीच असतात. आपण ज्यांना आपले नेते किंवा दैवत मानतो तेच आपल्या मुलाबाळांच्या भविष्याशी खेळत असूनही आपण शांत राहतो हे अधिक चिंताजनक आहे.
आज बँक व्यवस्थापनाशी संलग्न पॅनेलांना पाठिंबा देणाऱ्या, कार्यकर्त्यांची स्वतःची मुलेसुद्धा बेरोजगार आहेत. त्यामुळे या लढ्याची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. जर ठाणे जिल्ह्यातील शोषित तरुणांनी या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध एकजुटीने संघर्ष केला नाही, तर भविष्यात खरी पात्रता व गुणवत्ता यांना कोणतेही महत्त्व उरणार नाही. “पैशाच्या जोरावर सत्ता आणि सत्तेच्या जोरावर पैसा” हा खेळ जसा आज सुरू आहे, तसाच उद्याही चालू राहील. पण प्रश्न हा आहे तरुण या गंभीर प्रश्नांकडे गांभीर्याने बघेल का?

-जयदिप गवाळे-
.png)