आसामच्या मुख्यमंत्र्यांची वक्तव्ये ही कारभारातील त्रुटींवरून लक्ष विचलित करण्यासाठी
आगामी काही महिन्यांत आसाममध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. हे राज्य अनेक महत्त्वाच्या सामाजिक, आर्थिक निर्देशांकांमध्ये मागे आहे. मानवी विकास, दरडोई उत्पन्न, औद्योगिक रोजगार, उच्च शिक्षणातील प्रवेशदर हे इतर राज्यांपेक्षा पेक्षा कमी आहेत. तसेच आरोग्यविषयक अनेक निर्देशांकही चिंताजनक आहेत.
अशा राज्यातील कोणत्याही राजकीय नेतृत्वासमोर शासनाबाबत मूलभूत निवड असते. एक मार्ग म्हणजे आरोग्य, शिक्षण, उत्पन्न आणि रोजगारातील प्रणालीगत उणिवा ओळखून त्या दूर करणे आणि कामगिरीच्या जोरावर जनतेचा विश्वास संपादन करणे. दुसरा मार्ग कपटी आणि नीच वागणे हा आहे. काल्पनिक शत्रू निर्माण करून व एखाद्या समुदायाला दुसऱ्या समुदायाची भीती दाखवून निवडणुका जिंकणे आणि मुलभूत गरजांपासून लोकांना वंचित ठेवणे.
भाजपचे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी दुसरा मार्ग स्वीकारला आहे. त्यांनी मुस्लिम समुदायाला “लोकसंख्यात्मक धोका” आणि स्थानिकांसाठी “जीवन-मरणाचा प्रश्न” असे संबोधले. तसेच मुस्लिम रिक्षाचालकांना कमी पैसे द्यावेत जेणेकरून “ते त्रस्त होतील आणि आसाम सोडून जातील” असे आवाहन केल्याचा आरोप आहे. दोन वेळा मुख्यमंत्री असलेल्या सरमा यांनी शहरी पुरांसाठी मुसलीम समुदयाला दोष दिला आहे.शिक्षण, आरोग्य, रोजगार, मुलभूत सुविधा हे मुद्दे सोडून काल्पनिक भूत निर्माण करा आणि जनतेला अखंड त्याची भीती दाखवत राहा म्हणजे जनता आपल्यावर मतांची खैरात करत राहील हा एकमेव अजेंडा सरमा राबवत आहेत.
-जयदिप गवाळे-






.png)
