हिमालयाच्या बर्फात अचानक आग लागली
आहे आणि भाजपाचे कार्यालय या आगीत राखराख झाले आहे. नेपाळ मधील Gen Z सारखे आंदोलन भारताच्या लदाख मध्ये सुरू झाले असून, याला कारण ठरले आहेत थ्री इडियट्स मधील मुख्य
पात्र ज्यांच्याकडे बघून घेतले गेले आहे ते सोनम वांगचूक. सोनम वांगचुक तपास
यंत्रणांच्या रडारवर असून, विदेशी
मदत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. सोनम वांगचुक यांनी १५ दिवसांच्या
उपोषणानंतर शांततेसाठी हे उपोषण मागे घेतले आहे. त्यांची मागणी आहे की, लदाखला राज्याचा दर्जा देऊन संविधानाच्या सहाव्या
अनुसूचीत समाविष्ट केले जावे. हे का आवश्यक आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या अदोलनात लदाख मध्ये आतापर्यंत ४
लोकांचा मृत्यू झाला असून, ८०
पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. ५० पेक्षा जास्त लोकांना अटक झाली असून, सोनम वांगचुक यांनाही अटक झाली आहे. गृहखात्याचा
आरोप आहे की, या आगीला करणीभूत सोनम वांगचुक आहेत,
आणि सरकारी सर्व तपास यंत्रणा आता त्यांच्या मागे
लावण्यात आल्या आहेत.
२०१९ मध्ये भाजपाने लदाख मधील
लोकांना दिलेल्या वचनाची आठवण करून देण्यासाठी वांगचूक यांनी हे आंदोलन केले होते.
लदाख मधील ९०% जनता ही अनुसूचित जमाती (ST) कॅटेगरीमध्ये येते. जनतेची मागणी आहे की आम्हाला सहाव्या अनुसूचीत
सामील करून आमच्या जमिनीचे, संस्कृतीचे
आणि भाषेचे संरक्षण करावे, तरुणांना
रोजगार द्यावा, पर्यावरणपूरक उद्योग-धंदे यावेत आणि
लोकांचे जीवनमान उंचवावे. (२०१९ मध्ये भाजप ने हे देण्याचे मान्य केले होते)
परंतु प्रत्यक्षात सरकार विकासाच्या नावाखाली
संस्कृती आणि पर्यावरणाचा नाश करत आहे. मोठ्या मोठ्या धनिकांना व व्यापाऱ्यांना
उत्खननासाठी परवांनग्या दिल्या जात आहेत. या घटना वारंवार गृहखात्याला कळवूनही
कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. आणि म्हणूनच सरकारवर लदाखी जनतेचा विश्वास
राहिलेला नाही.
वांगचूक यांनी शांततामय आंदोलन केले,
परंतु याकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे
जनतेच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि आंदोलन हिंसक झाले. सरकारी कार्यालये, गाड्या आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यालय जनतेने
जाळून टाकले. वांगचूक यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी भडकाऊ भाषण दिले आणि त्या भाषणात नेपाळमधील Gen Z आंदोलनाचा उल्लेख केल्यामुळे आंदोलन उग्र झाले. व परकीय शक्तींचा पाठींबा घेऊन हे आंदोलन उभे केले आहे असा आरोप सरकार कडून लावण्यात आला आहे.
नेहमीप्रमाणे, एकेकाळी भाजप समर्थक असलेले वांगचूक आता देशद्रोही ठरवले जात आहेत.
रोहित वेमुला आंदोलन असो, JNU असो,
शेतकरी आंदोलन असो किंवा शाहीन बाग असो —
प्रत्येक आंदोलनाला "देशद्रोही" आणि "पाकिस्तान पुरस्कृत"
म्हणणे हा जणू सरकारचा एककलमी कार्यक्रम झाला आहे.
देश गुलामगिरीच्या उंबरठ्यावर उभा
आहे. पैशाने लोकांना वेश्येसारखे विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका बाजूला
बिहारमधील महिलांच्या खात्यावर निवडणुकीच्या तोंडावर अचानक दहा-दहा हजार रुपये जमा
होत आहेत, तर दुसरीकडे पुरात आपले सर्वस्व
गमावलेल्या शेतकऱ्याच्या तोंडाला केवळ आश्वासनाची पाने पुसली जात आहेत. तरुण
बेरोजगार झाले आहेत आणि विद्यार्थी फी च्या बोज्याखाली दाबला गेला आहे.

-जयदिप गवाळे-